महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई दि. २६ जून
महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना केली जावी, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी.
त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, यासंदर्भातील तक्रारींची तात्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदविण्यात यावा अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे केल्या.
मुंबईत विधान भवन येथे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि गोरक्षा समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नार्वेकर यांनी हे आदेश दिले.
नांदेड जिल्हयातील किनवट येथे गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोरक्षक कार्यकर्त्याची (शेखर रापेल्ली) समाजकंटकांकडून झालेली हत्या, अन्य सहा कार्यकर्ते गंभीर जखमी होणे तसेच गोरक्षक कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे नोंदविण्यात येणे या संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पशू कल्याण मंडळाचे कमलेश शाह, विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र गोशाळा संपर्क प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी आणि अन्य उपस्थित होते.
येत्या दहा दिवसात यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा मुंबईत विधान भवनात बैठक घेण्यात येणार आहे.
—–
