Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये करोना पंचसूत्री राबविण्यात यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई दि.२३ :- चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत.

चीनमध्ये करोना विषाणूचा बीएफ ७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.‌ राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावाही यावेळी घेण्यात आला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी करोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २ हजार २१६ करोना रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या नव्या विषाणूची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *