मुंबई आसपास संक्षिप्त
जयंत पाटील निलंबन विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. हाताला काळी फीत बांधून आमदारांनी शिंदे सरकारचा निषेध केला. या आंदोलनात विरोधपक्ष नेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते.
दहिसर पूर्व ते मीरारोड मेट्रो आता उत्तनपर्यंत
मुंबई – दहिसर पूर्व ते मीरारोड या मेट्रो ९ मार्गिकेतील राई, मुर्धा, मोर्वा गावातील कारशेड अखेर उत्तन येथे हलविण्यात येणार असल्याचे हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता ११.३८६ किमीची मेट्रो ९ मार्गिका आणखी चार किलोमीटरने विस्तारणार असून या मार्गिकेची धाव आता उत्तन येथील खोपरा गावापर्यंत असणार आहे.
बांदेकर, मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार
मुंबई – प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार तर अनुवादासाठीच्या पुरस्कारांमध्ये प्रमोद मुजुमदार यांच्या ‘सलाख्याचे प्रदेशः शोध सहिष्णु भारताचा’ या पुस्तकाचा समावेश आहे. सबा नकवी यांच्या ‘इन गुड फेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
देशातल्या २३ भाषांमधल्या ८ साहित्य प्रकारांच्या २३ पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक लाख रूपये रोख, ताम्रपट आणि महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पन्नास हजार रूपये रोख आणि ताम्रपट असे अनुवादासाठीच्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदासाठी निवडणूक?
मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी राजीनामा दिला. डक यांनी आपला राजीनामा पणन संचालकांकडे पाठवला असून तो मंजूरही झाला आहे. आता सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
दिशा सलीयान मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी
मुंबई – दिशा सलीयान मृत्यू प्रकरणी एसआयटी, अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा उपुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सभागहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.
सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना नाही
नागपूर – राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नसून अशा निर्णयाचे परिपत्रक बनावट असल्याची माहिती केसरकर यांनी कनिष्ठ सभागृहात लक्षवेधी प्रस्तावादरम्यान दिली.