मुंबईत विकासात्मक बदल करण्याचा राज्य शासनाचा संकल्प
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई दि.०९ :- देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये विकासात्मक बदल करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला असून, रखडलेले प्रकल्प पूर्ण करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील शहराची ओळख अधिक ठळक करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत विविध ठिकाणी राबिवण्यात येणाऱ्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाणार असून पुढील दोन वर्षांमध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल. तसेच मुंबईकरांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून ते किमान ३० वर्षे टिकतील. यावर्षी ५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास, पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते.
