डोंबिवलीत तरुणाईचा पर्यावरण रक्षणाचा आदर्श; गणेश विसर्जनातून २७ टन कचरा रोखला
डोंबिवलीत तरुणाईचा पर्यावरण रक्षणाचा आदर्श; गणेश विसर्जनातून २७ टन कचरा रोखला
डोंबिवली – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता डोंबिवलीतील तरुणांनी तो कृतीतून दाखवून दिला आहे. निर्मल यूथ फाउंडेशन (NYF) या सामाजिक संस्थेने आपल्या ९ वर्षांच्या अखंड परंपरेला साजेसा उपक्रम यंदाही यशस्वी करून दाखवला असून, तब्बल २७ टन कचरा नदी-तलावात मिसळण्यापासून वाचवला आहे.

गणेश विसर्जनाच्या १५, १८, १९ आणि २५ सप्टेंबर या चार प्रमुख दिवशी डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील प्रमुख नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर संस्थेने ‘निर्माल्य संकलन मोहीम’ राबवली.
महाविद्यालयीन युवकांचा सिंहाचा वाटा
या मोहिमेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनासोबतच स्थानिक महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकांनी मोलाची साथ दिली.
यामध्ये प्रगती कॉलेज, एस.आय.ए. कॉलेज, गार्डियन कॉलेज आणि मंजुनाथ कॉलेजच्या एन.एस.एस. युनिट्सच्या शेकडो स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष विसर्जन घाटांवर थांबून भाविकांचे प्रबोधन केले आणि निर्माल्य संकलित केले.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीत १११ वृक्षांची लागवड; निर्मल युथ फाउंडेशनच्या उपक्रमाचे शहरभर कौतुक
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत व्यापक जाळे
संस्थेचे स्वयंसेवक डोंबिवलीतील प्रमुख घाटांवर तैनात होते.
डोंबिवली पश्चिम – महालसा मंदिर तलाव (कोपर), जुनी डोंबिवली गणेश घाट, रेतीबंदर गणेश घाट, देवीचा पाडा आणि कुंभारखान पाडा गणेश घाट.

डोंबिवली पूर्व – भोईरवाडी तलाव (खांबालपाडा), आयरे गाव, प्रगती महाविद्यालयाजवळील कृत्रिम तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, रघुवीर नगर, टाटा पॉवरलाईन, ट्रॅफिक गार्डन आणि रीजन्सी इस्टेट.
याठिकाणी भाविकांकडून विसर्जनापूर्वीच फुले, दुर्वा, पत्री यांसारख्या ओल्या निर्माल्याचे प्लास्टिक, थर्मोकोल आणि सजावटीच्या साहित्यापासून वर्गीकरण करून घेण्यात आले.
निर्मल युथ फाउंडेशनतर्फे गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन; १७ हजार किलो निर्माल्य जमा
मोहिमेचे यश आकडेवारीत
या चार दिवसांच्या मोहिमेतून एकूण २६,९७८ किलो म्हणजेच २७ टनांहून अधिक कचरा जमा करण्यात आला.
यामध्ये १७,१४३ किलो ओले निर्माल्य सेंद्रिय खत निर्मितीसाठी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात आले आहे, तर ९,८३५ किलो सुका व प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी (Recycling) KDMC कडे सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “भाविकांनी विसर्जन स्थळी दाखवलेले छोटेसे सहकार्य हे आपल्या जलीय परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी आणि महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरील ताण कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व KDMC अधिकारी, महाविद्यालये, NSS समन्वयक आणि डोंबिवलीकर नागरिकांचे निर्मल यूथ फाउंडेशनने आभार मानले आहेत.

