ठळक बातम्या

अपुऱ्या माहितीवर नरेंद्रच्या व्यक्तिमत्त्वाबाबत तत्काळ निष्कर्ष काढू नये

नरेंद्र पवार यांच्यावरील आरोपांबाबत मित्रांचा निवेदन

मागील दोन दिवसांपासून कल्याणमध्ये नरेंद्र पवार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याविरोधात महिलेने विनयभंगाची तक्रार करून FIR दाखल केल्याची माहिती समाजमाध्यमे, फोन आणि मेसेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनात या घटनेबाबत संभ्रम, प्रश्न आणि शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.

नरेंद्र पवार यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो. माझ्याबरोबर काम करणारे संजय पाचपोर, शिवाजी दहीभावकर, संजय जोशी, प्रवीण घुगे, अमोल जोशी, प्रशांत पेशकार, श्रीरंग कुलकर्णी यांच्यासह अनेकांची नरेंद्रशी गेल्या ३५ वर्षांची ओळख आणि मैत्री आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अपुऱ्या माहितीवर किंवा चर्चांवर आधारित नरेंद्रच्या व्यक्तिमत्त्वाबाबत तत्काळ निष्कर्ष काढू नये, असे मला व्यक्तिगतरीत्या वाटते.

नरेंद्र गेली सुमारे २५ वर्षे सक्रिय राजकारणात काम करत आहे. कल्याण शहरातील कार्यकर्ता, नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार अशा विविध जबाबदाऱ्या त्याने सांभाळल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या महाराष्ट्रातील प्रमुख म्हणूनही त्याने संघटनात्मक जबाबदारी पार पाडली आहे.

लोकांशी असलेला सततचा संपर्क, आपुलकीने त्यांचे प्रश्न समजून घेणे, ते सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आणि अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी स्वतःची सोय बाजूला ठेवून मदत करण्याचा त्याचा स्वभाव—यामुळे नरेंद्र आपल्यामध्ये अनेक वर्षे प्रिय राहिला आहे. कल्याणमधील सर्वसामान्य नागरिकांशीही त्याची अशीच नाळ जोडलेली आहे.

या घटनेनंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा नरेंद्रची पत्नी आणि नगरसेविका हेमा यांनी सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटना घडल्यानंतर गणपतीच्या काळात संबंधित महिला नरेंद्र आणि हेमा यांना भेटण्यासाठी तसेच गणपती दर्शनासाठी त्यांच्या घरी आली होती आणि काही वेळ गप्पाही मारून गेली.याच कारणामुळे नरेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या तक्रारीमुळे धक्का आणि आश्चर्य वाटते आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेने यापूर्वी आपल्या पतीविरोधात POCSO कायद्यांतर्गत तक्रार केल्याचेही सांगितले जात आहे.

विनोद तावडे यांच्या निवासस्थानी दीड दिवसांच्या बाप्पाची भक्तिभावाने स्थापना

नरेंद्रच्या सार्वजनिक जीवनामुळे त्याचे समर्थक आहेत, तसेच

राजकीय आणि व्यावसायिक पातळीवर विरोधकही आहेत. स्थानिक प्रश्नांवर काही बांधकाम व्यावसायिकांच्या कामांना त्याने केलेला विधायक विरोध, त्याचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय आणि गेल्या काही वर्षांतील स्थानिक राजकीय घडामोडी यामुळे मतभेद निर्माण झालेले असू शकतात.

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये नरेंद्रचा झालेला मोठ्या उत्साहातील वाढदिवस आणि त्यानिमित्ताने नागरिकांनी लावलेले शुभेच्छा फलक, तसेच भविष्यातील खासदार म्हणून व्यक्त केलेल्या अपेक्षा, ही त्याची कल्याणमधील सर्वसामान्य नागरिकांशी असलेली नाळ दर्शवणारी उदाहरणे आहेत.

आज सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सत्य काय आहे, हे निष्पक्ष तपासातून समोर येणे. FIR दाखल झाली आहे, आरोप झाले आहेत; परंतु आरोप झाले म्हणजे दोष सिद्ध झाला असे होत नाही.नरेंद्रने स्वतः निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अधिक माहिती आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल,असे म्हटले आहे.

नरेंद्रचा जवळचा मित्र आणि हितचिंतक म्हणून आमचे सर्वांना एकच आवाहन आहे—समाजमाध्यमांवरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवून कोणाच्याही प्रतिमेबाबत घाईने निष्कर्ष नको काढूया.

या कठीण प्रसंगी मित्र म्हणून आम्ही नरेंद्रच्या पाठीशी आहोत. त्याचवेळी सत्य, निष्पक्ष चौकशी आणि न्याय्य कायदेशीर प्रक्रियेवरही आमचा पूर्ण विश्वास आहे.

राजेश सिन्हा