आयआयटी मुंबईत यवतमाळच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; प्राध्यापकांवर जातीय भेदभावाचा आरोप, गुन्हे शाखेकडून सखोल तपास
आयआयटी मुंबईत यवतमाळच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; प्राध्यापकांवर जातीय भेदभावाचा आरोप, गुन्हे शाखेकडून सखोल तपास
पवई / मुंबई: आयआयटी मुंबई (IIT Bombay) मधील बी.टेक ऊर्जा विज्ञान शाखेत शिकणाऱ्या साहिल रवींद्र वाकोडे (वय २० वर्ष, मूळ रा. यवतमाळ) या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पालकांनी थेट संस्थेतील प्राध्यापकांवर जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी मध्यावधी परीक्षेदरम्यान (Mid-Semester Exam) साहिलकडे मोबाईल सापडला होता. तो चॅटजीपीटीच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परीक्षा पर्यवेक्षकांनी केला. या घटनेनंतर विभागप्रमुखांनी साहिलचे समुपदेशन केले आणि त्याच्यावर कोणतीही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, असा विश्वास देऊन त्याला वसतिगृहातील (Hostel 4) खोलीवर पाठवले. मात्र, काही वेळातच त्याने राहत्या खोलीत टोकाचे पाऊल उचलले.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप साहिलचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांनी आयआयटी प्रशासनाविरोधात पवई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. साहिल अभ्यासात हुशार होता, त्याला पहिल्या वर्षात कोणताही बॅकलॉग नव्हता आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, त्यामुळे तो कॉपी करेल हे मान्य नसून त्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले गेले, असा दावा पालकांनी केला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला व इतर काही जण त्याला जातीवरून हीणवत मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
पोलीस कारवाई आणि गुन्हे शाखेकडे तपास पालकांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला व इतरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे (BNS कलम १०८) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) हा तपास वर्ग करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन व प्रशासनाची बाजू या घटनेनंतर आयआयटी आवारात विद्यार्थ्यांनी निदर्शने करत न्यायाची मागणी केली. परीक्षेतील वादानंतर साहिलला १ वर्षासाठी निलंबित करण्याची व वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, असा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.
दुसरीकडे, आयआयटी मुंबई प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे साहिलच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. साहिलने यापूर्वी SC/ST सेल किंवा प्रशासनाकडे भेदभावाची कोणतीही अधिकृत तक्रार केली नव्हती, असे स्पष्ट करत संस्था पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
सध्या गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तपासाअंतीच सर्व तथ्ये समोर येतील.

