सामाजिक

डोंबिवलीत रोटरी क्लबचा पहिला सायकल रॅली उत्साहात संपन्न; नेत्रदान, थॅलेसेमिया निर्मूलन आणि पर्यावरण रक्षणाचा जागर

डोंबिवली, ६ सप्टेंबर २०२६: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने आज पहिल्यांदाच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. एव्हरग्रीन सायकल प्रेमी डोंबिवली यांच्या सहकार्याने आयोजित या रॅलीचा मुख्य उद्देश नेत्रदान, थॅलेसेमिया निर्मूलन (End Thal Now) आणि पर्यावरण संरक्षण या तीन महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करणे हा होता.

सकाळी ६:३० वाजता सुरू झालेल्या या १० किलोमीटरच्या रॅलीमध्ये सुमारे ७० उत्साही सायकलस्वारांनी सहभाग घेतला. रॅली सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी क्लबच्या सदस्यांनी विशेष काळजी घेतली. दोन बाईक पुढे आणि दोन बाईक मागे, त्यासोबतच पीपी रघू यांच्या कार आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण मार्गावर सुमारे २० सदस्यांनी रॅलीचे नियोजन सांभाळले. आश्रय हॉस्पिटलने संपूर्ण रॅलीदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल क्लबने विशेष आभार मानले.

रॅलीनंतर मेडिकल डायरेक्टर रोटे. डॉ. भक्ती लोटे यांनी रोटरीच्या नेत्रदान केंद्राबद्दल माहिती दिली, तर पीपी डॉ. माधव बैतुले यांनी End Thal Now (ETN) प्रकल्पाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता सर्व सहभागींना पदक वितरण आणि स्नेहभोजनाने झाली. एका अर्थपूर्ण आणि संस्मरणीय सकाळचा अनुभव सर्वांना मिळाला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेडिकल डायरेक्टर रोटे. डॉ. भक्ती लोटे, पर्यावरण संचालक रोटे. सतीश अटकेकर, प्रोजेक्ट चेअर पीपी संतोष भांगे आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.

या नवीन उपक्रमामुळे समाजात जागरूकता निर्माण होण्यासोबतच रोटरीच्या परिवर्तन वर्षातील सेवाभावाचे दर्शन घडले, अशी भावना मानद सचिव रोटे. सुबोध आणि अध्यक्ष रोटे. अथर्व यांनी व्यक्त केली.