दादरमध्ये विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे दालन खुले; छबिलदास शाळेत अत्याधुनिक AI, गणित आणि रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन
मुंबई, ७ सप्टेंबर: दादर पश्चिम येथील १८९२ साली स्थापन झालेल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित आणि रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन आज दिमाखात पार पडले.

प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अजित भुरे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमुळे दादर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी AI, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज सारखे भविष्यातील तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र ताम्रस, संचालिका आरती राऊत, माजी विद्यार्थी विजय पाध्ये, मुख्याध्यापिका सौ. कोमल कडवे यांच्यासह अनेक आजी-माजी विद्यार्थी, संचालक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

९० प्रत्यक्ष प्रकल्प, रॅस्पबेरी पाय आणि अर्डुइनोवर आधारित प्रशिक्षण
या प्रयोगशाळेचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स सल्लागार डॉ. अमेय पांगारकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञान समजून न घेता ते स्वतः हाताळावे, प्रयोग करावेत आणि स्वतःच्या कल्पनेतून नवनवे प्रकल्प निर्माण करावेत, अशा पद्धतीने या लॅबची रचना करण्यात आली आहे.

या लॅबमध्ये रॅस्पबेरी पाय, अर्डुइनो आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानावर आधारित एकूण ९० प्रत्यक्ष प्रकल्पांचा समावेश आहे. तापमान, आर्द्रता, हवामान, सुरक्षा, हालचाल, मातीतील ओलावा, वायू गळती, RFID, प्रकाश नियंत्रण, वाहनतळ, पाण्याची पातळी या विविध विषयांवरील प्रकल्प विद्यार्थ्यांना स्वतः तयार करता येणार आहेत. याशिवाय पायथॉन प्रोग्रामिंग, ड्रोन जोडणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
कार्यक्रमात रोबोट, मानवरूपी रोबोट, ड्रोन आणि विविध यांत्रिक उपकरणांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले.

“तंत्रज्ञानातून विचार करायला शिकवणे महत्त्वाचे”
संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी म्हणाले, “१८९२ पासून शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या आमच्या संस्थेने काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारले आहे. आमचा उद्देश केवळ तंत्रज्ञान शिकवणे नाही, तर प्रश्न विचारणारे, प्रयोग करणारे आणि नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडवणे हा आहे.”

अजित भुरे यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “मुलांनी केवळ पाठ्यपुस्तकातून ज्ञान घेण्याऐवजी प्रश्न विचारले पाहिजेत आणि स्वतः काहीतरी निर्माण केले पाहिजे. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे.” मुख्याध्यापिका कोमल कडवे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी तयार उत्तरे शोधण्याऐवजी स्वतः प्रश्न विचारावेत आणि नवनिर्मिती करावी, ही आमची भूमिका आहे. या प्रयोगशाळेमुळे शिक्षण अधिक अनुभवाधारित आणि आनंददायी होणार आहे.”
शाळेतील वर्गखोल्यांनाही आधुनिक रूप देण्यात आले असून आकर्षक भित्तिचित्रे, डिजिटल फलक, आधुनिक बेंच आणि ध्वनियंत्रणा बसवण्यात आली आहे. “येथे स्वप्न पाहा – सर्वत्र यश मिळवा” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल छबिलदास शाळेने उचलले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

