मुख्यमंत्री फडणवीस यांची बोटचेपी भूमिका! – शेखर जोशी
डीजे वाजवायचा की नाही या वादात न अडकता पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे सांगितले. फडणवीस यांची ही भूमिका बोटचेपी आणि कुंपणावरची आहे.
सर्वसामान्य पुणेकर, सुजाण, सुसंस्कृत आणि सारासार विचार करणा-या फक्त पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सवासह दहिहंडी आणि नवरात्रौत्सवाचे झालेले बाजारीकरण, व्यापारीकरण, विकृतीकरण मान्य नाही. आपापल्या पद्धतीने ही मंडळी आपला निषेध करत आहेत, व्यक्त होत आहेत. पण सर्वपक्षीय राजकीय धटींगणांपुढे यांचे काहीच चालत नाही.
काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या ( अखंड शिवसेना असताना) तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा विचार बोलून दाखवला होता. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी खरे तर हा मुद्दा उचलून धरुन नियम, कायदा करून उंचच उंच मूर्तींच्या स्पर्धेवर बंदी घालायला हवी होती. पण तेव्हा शुभा राऊळ एकट्या पडल्या/पाडल्या गेल्या.
पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी जनमत एकवटल्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून फडणवीस ठोस व कठोर भूमिका घेणे अपेक्षित होते. डीजेचे समर्थन करणारे भाजपचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक यांना त्यांनी जाहीरपणे कानपिचक्या द्यायला हव्या होत्या. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी झालीच पाहिजे. डीजेवर निर्बंध नको असतील तर एक वर्ष पुण्यातील गणेशोत्सव साजरा झाला नाही तरी चालेल, पण कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या सर्वांना दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून जे करता येईल तेच करा, असे जाहीर आदेश द्यायला हवे होते.
पण फडणवीस यांनी कोणतीही ठोस व कठोर भूमिका न घेता गुळगुळीत, बोटचेपी आणि कुंपणावरची भूमिका घेतली. हे चुकीचे व निषेधार्ह आहे. फडणवीस आणि भाजप यांची ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ठाम व ठोस भूमिका घेतली आणि डीजेमुक्तच गणेशोत्सवास साजरा झाला पाहिजे, असे सांगितले आहे. त्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन.
सत्ताधाऱ्यांनी, सत्तेच्या प्रमुखांनी लोकानुनय न करता कधी तरी कटू वाटली तरी ठोस व ठाम भूमिका घेणे गरजेचे असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डीजे नकोच अशी ठाम व स्पष्ट भूमिका घेतली असती आणि पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव डीजेमुक्त झाला असता तर न भुतो… असे झाले असते आणि याचे श्रेय फडणवीस यांना मिळाले असते. एक नवा पायंडा, मापदंड निर्माण झाला असता. पण बोटचेपी आणि गुळमुळीत भूमिका घेऊन फडणवीस यांनी ती संधी घालवली आहे.
शेखर जोशी
१ सप्टेंबर २०२६

