Wednesday, June 10, 2026
Latest:
मनोरंजन

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’! सॅनहोजेमध्ये ७ ते ९ ऑगस्टदरम्यान तिसरा मराठी चित्रपट महोत्सव

अमेरिकेतील भारतीयांसाठी मनोरंजन, संस्कृती आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव; अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती

सॅनहोजे (कॅलिफोर्निया) :

अमेरिकेतील भारतीयांच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील सर्वात प्रतिष्ठित आणि बहुचर्चित ठरलेल्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’च्या (North American Marathi Film Association – NAFA) तिसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा सोहळा ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कॅलिफोर्नियातील सॅनहोजे थिएटरमध्ये रंगणार असून, तो गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक भव्य, ग्लॅमरस आणि दिमाखदार स्वरूपात साजरा होईल. हा महोत्सव केवळ मराठी चित्रपटांचा उत्सव नसून, अमेरिकेतील संपूर्ण भारतीय समुदायाला एकत्र आणणारा सांस्कृतिक महाकुंभ ठरणार असल्याची माहिती ‘नाफा’चे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजित घोलप यांनी दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ

​मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा, वैभव आणि सांस्कृतिक समृद्धी उत्तर अमेरिकेतील नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयातून ‘नाफा’ची स्थापना झाली आहे. अवघ्या काही वर्षांतच या संस्थेने अमेरिकेतील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या महोत्सवात हॉलिवूडच्या रेड कार्पेट परंपरेची झलक, चित्रपटांचे भव्य प्रीमियर, कलाकारांशी थेट संवाद, मास्टरक्लासेस आणि मनोरंजनाचे विविध रंग प्रेक्षकांना पाहायला मिळतील. विशेष म्हणजे ‘नाफा’च्या प्रयत्नांमुळे उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांना महाराष्ट्रातील चित्रपट त्याच दिवशी तिथे चित्रपटगृहात पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

​यापूर्वी ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’ आणि ‘सलतात रेशीम गाठी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांना अमेरिका आणि कॅनडामध्ये रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

दिग्गजांची मांदियाळी आणि ‘नाफा’चा विस्तार

​या महोत्सवाची शान वाढवण्यासाठी यंदा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलावंत अमेरिकेत हजेरी लावणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, गुरु ठाकूर, श्रुती मराठे आणि गिरिजा ओक यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

अभिजित घोलप यांनी सांगितले की,

​”अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आता साकार होत आहे. आज ‘नाफा’शी १,००० हून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. चित्रपट निर्मितीसोबतच रेडिओ आणि ओटीटी (OTT) क्षेत्रातही नाफाचा विस्तार झाला असून, फिल्म क्लबद्वारे अनेक लघुपटांची निर्मिती होत आहे.”

 

नियोजन समिती सज्ज

​’नाफा २०२६’ च्या यशस्वी आयोजनासाठी एक अनुभवी आणि समर्पित संचालक मंडळ कार्यरत आहे. यामध्ये सह-समन्वयक म्हणून अर्चना सराफ (टेक्सास) व रिया ठोसर (कॅलिफोर्निया), आणि कोषाध्यक्ष म्हणून विनायक फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय गौरी कुलकर्णी (मास्टरक्लासेस), भालचंद्र कुलकर्णी (चित्रपट स्पर्धा), पूजा कारखानीस (रेड कार्पेट), योगी पाटील (आयटी इन्फ्रास्ट्रक्चर), मानसी देवळेकर (प्रसिद्धी जनसंपर्क) आणि लक्ष्मण आपटे (अतिथी संपर्क) हे विविध समित्यांचे नियोजन पाहत आहेत.

​हॉलिवूडचा झगमगाट आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान यांचा अनोखा संगम असलेला ‘नाफा २०२६’ हा उत्तर अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी वर्षातील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा ठरणार असून, जगभरातील मराठी रसिकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.