Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एक दूरदर्शी नेतृत्व हरपले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई:

डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डॉ. पाटील यांच्या रुपाने समाजाने एक दूरदर्शी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना त्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे विविध राज्यांचे राज्यपाल अशा महत्त्वाच्या घटनात्मक पदांपर्यंत पोहोचला. हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि उल्लेखनीय असाच राहिला आहे.

बळजबरीने धर्मांतराला आता ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा’; नियम मोडल्यास ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद

शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील मोलाचे योगदान

शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात डॉ. पाटील यांचा मोठा वाटा होता. समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचे मोठे जाळे उभारण्यासोबतच, नवी मुंबईत जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारून त्यांनी क्रीडा क्षेत्रालाही मोठी चालना दिली. याशिवाय कृषी व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या या अलौकिक योगदानाची दखल घेऊनच केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या उच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.

शोक संदेशाच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने आणि राज्याने एक उत्तुंग नेतृत्व गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.”