कोकणवासियांसाठी मोठी बातमी: मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणार नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन!
ठाणे:
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक (रोज धावणारी) एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही नवीन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदारांच्या पाठपुराव्याला यश
कोकण रेल्वेच्या सेवेबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने विविध मागण्या करत होते. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सोडण्याची प्रमुख मागणी लावून धरली होती.
ही मागणी अखेर मान्य झाली असून, केंद्र सरकारच्या ‘PIB’ (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
डोंबिवलीत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ पुरुषांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड शिबिराचा शुभारंभ
रेल्वे मंत्र्यांचे आभार
मागणी मान्य झाल्यामुळे कोकणवासीयांमध्ये आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे कोकणवासियांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

