Wednesday, August 19, 2026
Latest:
Uncategorizedसामाजिक

भारतीय मजदूर संघाचा एल्गार! कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्टला देशभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन

सचिन शिंदे

रांची:

देशभरातील कामगारांच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाने (BMS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर भव्य देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संघटनेच्या अखिल भारतीय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

झारखंडमधील रांची येथील सरला बिर्ला विद्यापीठात २६ ते २८ जुलै दरम्यान अखिल भारतीय कार्यसमितीची तीन दिवशीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री एस. मल्लेशम हे होते.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

केंद्र सरकारकडे मांडण्यात येणाऱ्या प्रमुख ११ मागण्या:

१. किमान वेतन: देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन दरमहा ₹३०,००० निश्चित करण्यात यावे.

२. किमान पेन्शन: ईपीएफ (EPF) अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० प्रतिमहिना करावी.

३. ईएसआयसी वेतन मर्यादा: ESIC ची वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.

४. ईपीएफ वेतन मर्यादा: EPF वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹३०,००० पर्यंत वाढवण्यात यावी.

५. ग्रॅच्युइटी मर्यादा: ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा ₹२० लाखांवरून ₹४० लाख करण्यात यावी व सर्वांना लाभ मिळण्याची खात्री करावी.

६. बोनस मर्यादा: बोनस गणनेची वेतन मर्यादा ₹७,००० वरून ₹१८,००० आणि पात्रतेची मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करावी.

७. समान काम – समान वेतन: कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना “समान काम – समान वेतन” हे तत्व प्रभावीपणे लागू करावे.

८. योजना कामगार मानधन: अंगणवाडी, आशा व इतर सर्व योजना (Scheme) कामगारांच्या मानधनात भरीव वाढ करावी.

९. श्रमसंहिता (Labour Codes): कामगार कायद्यांमधील कामगारविरोधी तरतुदी रद्द कराव्यात किंवा आवश्यक सुधारणा कराव्यात.

१०. बँक कर्मचारी: बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून ५ दिवसांचा कामकाजाचा नियम तातडीने लागू करावा.

११. कामगार सुरक्षा: सर्व पात्र कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि ग्रॅच्युइटीचा लाभ सुनिश्चित करण्यात यावा.

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:

या राष्ट्रीय बैठकीस सरचिटणीस श्री सुरेंद्र कुमार पांडे, संघटन मंत्री श्री बी. सुरेंद्रन, माजी अध्यक्ष श्री सी. के. साजी नारायणन, श्री हिरण्मय पंड्या यांच्यासह महाराष्ट्रातून केंद्रीय सचिव श्री अनिल ढुमणे, महाराष्ट्र सरचिटणीस श्री किरण मिलगीर, श्री सचिन मेंगाळे, श्री राजू भालेराव, श्री श्रीपाद कुटासकर, श्री रामनाथ किणी, श्री मंगेश देशपांडे यांसारखे २० हून अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार तयारीचे आदेश:

भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री सुधांशू रानडे आणि सरचिटणीस श्री किरण मिलगीर यांनी राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि संलग्न संघटनांना १७ ऑगस्टच्या धरणे आंदोलनाची जोरदार तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व कामगारांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.