अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कल्याण जिल्ह्याकडून ‘पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा’ गौरव व शुभेच्छा सोहळा; २१ जुलै रोजी आयोजन
कल्याण:
‘ज्ञान, शील, एकता’ या त्रिसूत्रीच्या आधारे गेली ७८ हून अधिक वर्षे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कल्याण जिल्ह्याच्या वतीने ‘पूर्ण वेळ कार्यकर्ता शुभेच्छा कार्यक्रम २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता कल्याण (पश्चिम) येथील दत्त आळीतील बालक मंदिर प्रशालेच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
‘मी समाजाचे देणे लागतो‘ या भावनेतून उच्चशिक्षित कार्यकर्ते आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर एका निश्चित कालावधीसाठी आपले घर-दार सोडून संघटना सांगेल त्या भागात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी जात असतात. अभाविपची हीच व्यक्तिनिर्माणाची परंपरा पुढे चालू ठेवत यंदा कल्याण जिल्ह्यातील दोन ध्येयवादी कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये डोंबिवलीचे दीपक शर्मा आणि टिटवाळा-शहापूर भागातील धीरज आगिवले या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
हे दोन्ही कार्यकर्ते इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन आपले पूर्णवेळ योगदान देणार आहेत.
या दोन्ही कार्यकर्त्यांना सदिच्छा व शुभाशीर्वाद देण्यासाठी कल्याण जिल्ह्यातील परिषद परिवाराने या विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सेवा प्रमुख श्री. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहेत, तर मुख्य वक्ते म्हणून अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री. देवदत्त जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
नेहमीच राष्ट्रकार्यासाठी प्रशिक्षित आणि सुसंघटक कार्यकर्ते निर्माण करणारा ‘दीपस्तंभ’ म्हणून कल्याण जिल्हा ओळखला जातो. आपल्या जिल्ह्यातील या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आणि या संस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभाविप कल्याण जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
दिवस व दिनांक: मंगळवार, २१ जुलै २०२६
वेळ: सायं. ठीक ५:३० वाजता
स्थान: बालक मंदिर प्रशालेचे सभागृह, दत्त आळी, कल्याण (पश्चिम)
