गुन्हे-वृत

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ‘मकोका’ अंतर्गत मोठी कारवाई; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह ८ आरोपींना अटक

कल्याण:

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आणि त्याच्या आसपासच्या भागात गेल्या अनेक वर्षांपासून उघडपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायाच्या काळ्या कारभारावर अखेर कायद्याचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत कल्याण पोलिसांनी एका ऐतिहासिक आणि अत्यंत कडक कारवाईला अंजाम दिला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) सारख्या गंभीर कलमांतर्गत टोळीच्या मुख्य सूत्रधारासह आठ आरोपींना गजाआड केले आहे, तर नरकयातना भोगण्यास भाग पाडलेल्या २० पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे.

बेकायदा बांधकामे: नवी मुंबई मनपाची न्यायालयात कानउघाडणी; ४०० दोषी अधिकाऱ्यांवर केवळ ‘नोटीस’ का?

अनेक वर्षांपासून कल्याणचा रस्ता होत होता कलंकित

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनवरून गुरुदेव हॉटेलमार्गे शिवाजी चौकाकडे जाणारा रस्ता आणि रेल्वे ओव्हरब्रिज हा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून या बेकायदेशीर व्यवसायाचा मुख्य अड्डा बनला होता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अंधार पडताच या रस्त्यांवर संशयास्पद अवस्थेत महिलांची गर्दी सुरू व्हायची. यातील सर्वात वाईट परिस्थिती स्टेशनपासून ते महालक्ष्मी हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर पाहायला मिळत होती, जिथे संध्याकाळनंतर सुजाण कुटुंबातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना या रस्त्यावरून चालणे अत्यंत कठीण झाले होते. भररस्त्यात चालणाऱ्या या घाणेरड्या प्रकारामुळे संपूर्ण परिसर बदनाम आणि कलंकित होत होता.

कडोमपाचा गलथान कारभार: कल्याणमधील मुख्य हिंदू श्मशानभूमी बनली कचऱ्याचे आगार, नागरिकांमध्ये तीव्र संताप

‘मकोका’च्या प्रहारामुळे गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार

जनतेचा हा त्रास आणि कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने यावेळी अत्यंत कठोर भूमिका घेतली. केवळ नावापुरती कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हा रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी संघटित गुन्हेगारी (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात समोर आले की, आरोपींकडे उत्पन्नाचा कोणताही कायदेशीर मार्ग नव्हता आणि ते पूर्णपणे याच घृणास्पद गुन्ह्यावर आपला उदरनिर्वाह करत होते. पश्चिम बंगालपर्यंत पाठलाग करून पकडलेला मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या सैय्यद आणि मीता बारीक यांच्यासह सर्व आठ आरोपींना झालेली अटक ही पोलीस आता हे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करणार असल्याचे स्पष्ट दर्शवते.

अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या देखरेखीखाली झालेल्या पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांची ही ऐतिहासिक कठोर कारवाई अनेक वर्षांपासून कल्याणच्या कपाळाला लागलेला हा कलंक कायमचा पुसून टाकेल आणि नागरिक आता या रस्त्यांवरून निर्भयपणे ये-जा करू शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.