टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरण: आंतरराज्यीय टोळी गजाआड, मुख्यमंत्र्यांकडून ‘SIT’ चौकशीचे आदेश
कल्याण:
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट बिहार आणि हरियाणा राज्यांपर्यंत पोहोचले असून, भिवंडीतील ‘कोण’ गावातून अटक करण्यात आलेल्या तीन मुख्य आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अमेझॉन रिटेलचा परवाना निलंबित!
दीड कोटी रुपयांना पेपर विकण्याचा होता डाव
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी राजीव कुमार, आकाश कुमार (दोघेही बिहारचे रहिवासी) आणि धीरज सिंग (हरियाणाचा रहिवासी) हे दिल्लीहून थेट महाराष्ट्रात आले होते.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील ‘कोण’ गावामध्ये टीईटीचा गोपनीय पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा या टोळीचा कट होता. मात्र, ठाणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वेळेत कारवाई करत या तिघांच्या मुसक्या आवळल्या.
सुनावली ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
रविवारी पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले होते. हे प्रकरण आंतरराज्यीय रॅकेटशी जोडलेले असल्याने आणि आरोपींकडून महत्त्वाची माहिती हस्तगत करायची असल्याने सखोल तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी केला.
त्यानंतर न्यायाधीश एस. एम. सुतार यांनी आरोपींची गांभीर्याने दखल घेत त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
‘SIT’ कडून होणार सखोल तपास; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश
या गंभीर पेपरफुटी प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पेपरफुटीचे हे जाळे नेमके किती मोठे आहे, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि यामध्ये आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींचा किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, याचा शोध ‘SIT’ घेणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी सविस्तर चर्चा करून दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
