डोंबिवलीतील नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई!
डोंबिवलीतील नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई!

डोंबिवली: हिमालयातील प्रतिकूल वातावरणावर मात करत डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी माऊंटेनियर्स असोसिएशनच्या प्रशिक्षकांच्या साथीने ५ हजार ३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. माऊंटेनियर्स असोसिएशनची ही तिसरी मोहीम होती, जी २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. या मोहिमेमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प चढाईचा समावेश होता.

कठीण परिस्थितीत घेतले विशेष प्रशिक्षण
असोसिएशनचे कुशल आणि अनुभवी प्रशिक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चढाई मोहिमेतील सदस्यांना हिमालयातील सततचे बदलणारे वातावरण, तेथील जीवनशैली, सततचा हिमवर्षाव, त्या वेळी घ्यावयची काळजी आणि सुरक्षा साधनांचा वापर याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण दिले गेले.

व्यावसायिक जबाबदारी सांभाळत साधले यश
डोंबिवलीच्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील या आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळण्यासोबतच नगरसेविका पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. सामाजिक कार्य, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकास कामांकडे लक्ष देणे तसेच महापालिकेच्या सभा आणि बैठकांमधून वेळ काढून त्यांनी या हिमालय मोहीम प्रशिक्षण उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवी मुंबई विमानतळ नामकरण: कल्याण-डोंबिवलीतून भाजप नगरसेविका डॉ. सुनिताताई पाटील यांचा प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा
मोहिमेतील इतर सहभाग आणि मागील कामगिरी
या मोहिमेत डॉ. सुनीता पाटील यांच्यासह देवदत्त दिगवडेकर, प्रतीक दिगवडेकर, मनीष खराट, ज्योती जोशी, माया दिगवडेकर, अभिजित कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर आणि पद्माकर गायकवाड हे सदस्यही सहभागी झाले होते. या सर्व गिररोहकांनी यापूर्वीही एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी केली असून, चादर ट्रेक, मरका व्हॅली, सतोपथ ट्रेक, तपोवन ट्रेक आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे अनेक ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अशाप्रकारांच्या मोहिमा आयोजित करून नागरिकांना पर्यावरण संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले जाते. निसर्गाची आपण काळजी घेतली तर तो नंदनवनासारखा ठेवू शकतो, मात्र निसर्गाची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. हा सर्व अनुभव नागरिकांना मिळावा व पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशातून अशा मोहिमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती माऊंटेनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गायकवाड आणि सचिव दिलीप भगत यांनी दिली आहे.

