कल्याणमध्ये शस्त्रसज्ज सराईत गुन्हेगार अटकेत, दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त
ठाणे, २५ जून – ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा येथून एक सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूसासह अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहितीप्रमाणे, सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (वय ३० वर्षे, व्यवसाय – फळविक्री) हा बंदरपाडा, कल्याण पश्चिम येथील रोशन किराणा स्टोअर्सच्या शेजारी बेकायदेशीररित्या शस्त्र ठेवून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहने रोड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ₹1,00,500 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 547/2025 नुसार शस्त्र अधिनियम कलम 3, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शिंदे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत:
1. गु.र.नं. 56/2023 – भादंवि कलम 326, 504, 34 (खडकपाडा पोलीस ठाणे)
2. गु.र.नं. 444/2025 – एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब)
सदर प्रकरणी 30 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत.
