तहव्वुर राणा प्रत्यार्पण प्रकरण : कोणाकोणाचे बुरखे फाटणार?
२६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक हल्ला मानला जातो. या हल्ल्यामागे लष्करे तैय्यबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. या हल्ल्याच्या नियोजनात आणि माहिती संकलनात डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वुर राणा यांची महत्त्वाची भूमिका होती. आता, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तहव्वुर राणा भारताच्या ताब्यात मिळणार आहे.
या घडामोडीने पाकिस्तानसह भारतातही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाच्या गोंधळलेल्या प्रतिक्रिया आणि नेत्यांच्या वक्तव्यांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राणाच्या जबाबांमुळे उघड होणार अनेक रहस्ये?
राणाच्या चौकशीतून पाकिस्तानमधील आयएसआय, लष्कर आणि सरकारमधील कोणकोणते घटक या कटात सहभागी होते, याबाबत अनेक रहस्ये उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याचं नियोजन केवळ मुंबईपुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्यात राष्ट्रीय संरक्षण संस्थांपासून धार्मिक मेळ्यांपर्यंत अनेक ठिकाणांची रेकी करण्यात आली होती.
काँग्रेस पक्ष तणावात का?
या प्रकरणावर काँग्रेसने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. उलट पृथ्वीराज चव्हाण यांना राणाला ‘योग्य कायदेशीर मदत’ मिळतेय का याची चिंता असल्याचं दिसतं, तर माजी गृहमंत्री चिदंबरम यांना याचं श्रेय मोदी सरकारकडे जाईल याची.
तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणाच्या खोलात गेल्यास २००६-२०१० दरम्यान गृहमंत्रालयात झालेल्या काही निर्णयांचा वेध घेतल्यास काँग्रेसच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. त्याकाळी ‘भगवा दहशतवाद’ हा एक काल्पनिक नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला होता. समझोता एक्स्प्रेस प्रकरणात पाकिस्तानी अतिरेक्यांना वाचवून काही हिंदू नेत्यांवर खटले रचले गेले, असा आरोपही माजी अधिकारी आरव्हीएस मणी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
हल्ल्यातून हिंदूंच्या बदनामीचा डाव?
२६/११ च्या अतिरेक्यांकडे हिंदू नावांची ओळखपत्रे, हातात पूजाविधीतील धागे बांधलेले होते. हे सर्व मारले गेले असते, तर हा हल्ला हिंदू संघटनांनी केल्याचा खोटा आरोप शक्य होता. मात्र शहीद पोलीस तुकाराम ओंबाळे यांच्या शौर्यामुळे अजमल कसाब जिवंत पकडला गेला आणि पाकिस्तानचा कट उघडकीस आला.
काँग्रेसचा संयम — धैर्य की भिती?
हल्ल्यानंतर तात्काळ कारवाईसाठी सैन्यदल प्रमुख सज्ज होते. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मौन बाळगले. अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केल्याप्रमाणे, “पाकिस्तानवर कारवाई केल्यास देशात मुस्लिमविरोधी भावना वाढू शकते,” असा काँग्रेस सरकारचा युक्तिवाद होता. काही तज्ञांच्या मते, कारवाई केल्यास भारतातील कटात सामील काही जणांची नावे पाकिस्तानकडून उघड होण्याची भीतीही सरकारला होती.
राहुल भट प्रकरणावरही मौन
राणा आणि हेडली यांना मदत करणारा म्हणून चर्चेत आलेला सिनेदिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा राहुल भट याला का सोडण्यात आले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ च्या हल्ल्याशी संबंधित अनेक अज्ञात पैलू समोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, राणा काय उघड करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही चौकशी केवळ न्याय मिळवण्यासाठी नव्हे, तर भविष्यात अशा कटांपासून देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
साभार – अभिजित जोग