नव्या कलाकारांना घेऊनही ‘ऑल द बेस्ट’ नाटक यशस्वी!
देवेंद्र पेम सत्कार सोहळ्यात प्रशांत दळवी यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. २ डिसेंबर
नावाजलेले कलाकार घेऊनच नाटक करायला हवे या विचाराला ‘ऑल द बेस्ट’ नाटकाने खो दिला. चौकट मोडून नव्या चांगल्या कलाकारांना घेऊनही नाटक यशस्वी करता येते हे दाखवून दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक- नाटककार प्रशांत दळवी यांनी केले.
‘ऑल द बेस्ट’ हे नाटक १२ भाषांमध्ये भाषांतरित झाल्याच्या निमित्ताने नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा सत्कार दळवी आणि लेखक व नाटककार क्षितिज पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी दळवी बोलत होते. उद्योगपती महेश मुद्दा यांच्या दादर येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सातत्याने आगळे वेगळे कार्यक्रम आयोजित करणारे ज्येष्ठ माजी नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
इरावती कर्णिक, सुरेश जयराम, नीरज शीरवईकर, राजू तुलालवार, विराजस कुलकर्णी आदी नव्या जुन्या पिढीचे लेखक या कार्यक्रमास उपस्थित होते.
‘ऑल द बेस्ट’ हे नाटक अजूनही अनेक भाषांमध्ये भाषांतरित होईल, अशा शुभेच्छाही दळवी यांनी यावेळी दिल्या.
‘ऑल द बेस्ट’ नाटक मी अनेक वेळा पाहिले. या नाटकाने रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले. रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट माध्यमात सध्या कार्यरत असलेल्या अनेक नामवंत कलाकारांची कारकीर्द ‘ऑल द बेस्ट’ नाटकापासून सुरू झाली असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पेम यांनी मुळ्ये काका तसेच ‘ऑल द बेस्ट’ चा प्रवास ज्यांच्यामुळे सुरू झाला ते निर्माते मोहन वाघ, नाटकाच्या पहिल्या संचातील कलाकार भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर तसेच मूळ एकांकिकेतील विकास कदम, दीपा परब यांचे आभार मानले.
‘ऑल द बेस्ट’ नाटक बारा भाषांमध्ये भाषांतरित होणे कौतुकास्पद बाब असून त्यासाठीच पेम यांचा हा सत्कार. वेगवेगळ्या संकल्पना सतत डोक्यात येतात. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कलाकार, मान्यवर व दानशूर व्यक्ती सढळ हस्ते मनापासून व प्रेमाने आर्थिक मदत करतात. त्यांच्या सहकार्यानेच आजवर सर्व कार्यक्रम यशस्वीपणे सादर करू शकलो, असे मुळ्ये काका यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीलिमा गोखले आणि अन्य काही जणांनी वेगवेगळी गाणी सादर केली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे” हे पुस्तक महेश मुद्दा यांनी उपस्थित सर्वांना भेट दिले.
शेखर जोशी यांच्या फेसबुक वरुण साभार