सामाजिक

डोंबिवली जवळ खंबाळपाडा गाव जाग्यावर, मात्र स्मशानभूमी जणू फिरती

खंबाळपाडा- कांचनगाव ९० फिट रोडवरील स्मशानभूमी. गेल्या २५ वर्षात या गावातील स्मशानभूमीची जागा तीन वेळा बदलण्यात आली. ४ – ५ वर्षांपूर्वी  कुठे एकदाची स्मशानभूमी मिळाली असे वाटत असताना पुन्हा एकदा चालू स्थितीतील हि स्मशानभूमी एका मोठ्या बिल्डरच्या घशात घालन्यात आली आहे. एकप्रकारे खंबाळपाडा गाव जाग्यावर मात्र स्मशानभूमी जणू फिरती झाली आहे.

महापालिका स्थापनेच्यावेळी जी गावे महापालिकेत समाविष्ट झाली, त्या बहुतांश गावांना पूर्वीपासून स्मशानभूमी होत्या. त्याला कांचनगाव – खंबाळपाडा देखील अपवाद नाही. मात्र कल्याण डोंबिवली  रेल्वे समांतर असा ९० फिट  रस्ता तयार करण्यात आला त्यावेळी येथील जुनी स्मशानभूमी बाधित झाली. अनेक वर्षे स्मशानभूमीतील एक लोखंडी स्टेंड रस्त्याच्या एका बाजूला  होता व तिथेच अंत्यसंस्कार केले जात होते.

१० – १५ वर्षांपूर्वी नवीन  स्मशानभूमीसाठी  आरबीटी स्कूल जवळ जागा देण्यात आली होती, मात्र त्यावेळी तेथून ती स्मशानभूमी अचानक मंगलमूर्ती समोर रेल्वेलाईन लगत हलविण्यात आली. मंगलमूर्ती जवळील स्मशानभूमी पुन्हा एकदा तेथून म्हसोबा चौका जवळ आरक्षित असलेल्या जागेवर आणण्यात आली. एकप्रकारे खंबाळपाडा गाव जाग्यावर मात्र स्मशानभूमी जणू फिरती झाली होती.

९० फिट रोडवर कांचनगाव खंबाळपाडा येथे सर्व्हे नं.हि.नं .१०३ जुना ७,३ व आरक्षण क्र .४६ हा सुमारे १७ गुंठे भूखंड स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे. अगदी प्राईम लोकेशनवर असलेल्या या भूखंडावरील स्मशानभूमीत एक लोखंडी स्टेंड व एक चौथरा बांधण्यात आला आहे. या स्मशानभूमीत अन्य कोणत्याही सुविधा नसल्या तरी पत्र्याचे कम्पाऊंड असल्याने गेल्या काही वर्षांपासून तेथे दहन व दफन केले जात आहे.

९० फिट रोडवर आज शेकडो मोठे कॉम्प्लेक्स झाले असून हजारो नागरिक राहत आहेत. त्यांच्यासाठी व स्थानिक गावकऱ्यांसाठी हि स्मशानभूमी अत्यंत सोयीची अशी ठरली होती. आज ना उद्या खंबाळपाडा  स्मशानभूमी अद्यावत बांधली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्राईम लोकेशनवर असलेल्या त्या भूखंडावर भूमाफिया व बिल्डर्स ,राजकारणी  आदींचा डोळा होता, हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले नाही.
९० फुट रस्त्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमी पलीकडे रेल्वे लगत आणखी एक अवघ्या ७ गुंठे क्षेत्राचा भूखंड आरक्षण क्र. ४५ पार्किंगसाठी राखीव होता. त्या भूखंडाच्या मधून नाला गेला आहे. त्या जागेत व  रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून भूखंड मोठा करण्यात येत आहे. या भूखंडातून दोन नाले जात आहेत. त्या नाल्याच्या ठिकाणी मोठे पाईप व भराव टाकला आहे. आता या पार्किंगच्या जागेवर स्मशानभूमी हलविणण्यात आली आहे. खाली नाला असलेल्या
प पार्किंगच्या जागेत हलविण्याचे कारणच काय ?
दुसरी बाब म्हणजे पार्किंगसाठी या भागात जागाच शिल्लक नाही. पार्किंगसाठी आरक्षित भूखंड असताना खरं तर त्यावर पार्किंगच व्हायला हवे. पार्किंगची सोय नसल्याने येथील नागरिकांना म्हसोबा चौकात रस्त्यावरच दुचाकी पार्क कराव्या लागत आहे. आरक्षित मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे पाप कोण करीत आहे.
वास्तविक कोणतेही आरक्षण बदल करण्यापूर्वी महासभेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. तसा ठराव करून तो राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवावा लागतो. राज्य शासनाने आरक्षण बदलास मान्यता दिली तरच असा बदल शक्य आहे. अन्यथा नाही. मात्र महापालिकेत सध्या नगरसेवकांची राजवट नसून प्रशासकीय राजवट आहे. आयुक्तांना अनेक अधिकार प्राप्त झाले असले तरी आरक्षण व आरक्षणाच्या जागेत बदल करण्याचा अधिकार त्यांना नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. एकाच मालकाच्या एकाच सर्व्हे नंबर असलेल्या भूखंडावर अनेक आरक्षणे असल्यास आरक्षण बदल करता येतो, मात्र तो भूखंड रस्त्यात विभागाल गेला असल्यास आरक्षण बदल करता येत नाही, असा शासकीय नियम आहे. मात्र या प्रकरणात आजूबाजूचे मालक व सर्व्हे नंबर वेगळे असताना एका आमदार नव्हे मंत्र्याच्या जवळच्या बिल्डरसाठी सगळा खटाटोप केला.
स्मशानभूमीचा भूखंड एखाद्या बिल्डरला देणारी कल्याण डोंबिवली महापालिका हि देशातील पहिली महापालिका ठरेल. आणखी एक म्हणजे पार्किंगच्या जागेत स्मशानभूमी बांधण्याचे काम महापालिकेने केले नाही तर त्या बिल्डरने केले आहे.

स्मशानभूमीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी नियमबाह्य आरक्षण बदल नव्हे तर चेंज ऑफ लोकेशन करण्यात आले. एव्हढे सगळे घडत असताना खंबाळपाडा गावातील स्थानिक माजी नगरसेवक, आमदार  यांनी आवाज उठविला नाही. याचे कारण फक्त आणि फक्त आर्थिक फायद्यासाठी खंबाळपाड्याची स्मशानभूमीच बिल्डरच्या घशात घालण्याचे पाप कोणी केले हे तुमच्या लक्षात आले असेलच.आहे.   मढ्याच्या टाळू वरील लोणी खाण्याचाच हा प्रकार  आहे. गावची स्मशानभूमी देखील विकली जात असताना गावातून निवडून आलेले नगरसेवक आमदार  चिडीचूप का झाले  .त्यामुळे असे लोकप्रतिनिधी आमदार पुन्हा निवडून देणार का ? हाच डोंबिवली करांना प्रश्न आहे.

कुठे फेडाल हे पाप ? अरे कशाकशात तुम्ही पैसे खाता?, किमान स्मशानभूमी तरी सोडायला हवी होती!