डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयातील अनुदानीत शिक्षकांनी काळे कपडे घालून साजरा केला शिक्षक दिन
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. वि. पेंढरकर महाविद्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानीत विभागातील शिक्षकांना एका खोलीत बसवून शिकविण्याचे काम करू दिले जात नाही.
अनुदानीत महाविद्यालय विनाअनुदानित करण्याच्या संचालक मंडळाच्या अट्टाहासापायी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अनुभवी शिक्षकांना बसवून ठेवून अनेक अननुभवी नवीन शिक्षकांना वर्गांवर पाठविले जाते.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानीत महाविद्यालयात विद्यापीठाची मान्यता असलेल्या प्राचार्यांची नेमणूक झालेली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या कागद पत्रांवर विनाअनुदानित व विद्यापीठाची मान्यता नसलेले प्राचार्य सह्या करीत आहेत.
भविष्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.या गोष्टींकडे संचालक मंडळ आणि विद्यापीठ प्रशासन देखील दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या अनियमितता दिसून येत आहे.
अनुदानीत विभागात गुणवत्ता प्राप्त व विद्यापीठाची मान्यता असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर बोलू दिले जात नाही याचा निषेध करण्यासाठी अनुदानीत विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काळे कपडे घालून व तोंडाला काळा मास्क लावून शिक्षक दिन साजरा केला.
आम्ही शिक्षक असूनही शिकवू शकत नाही.
गेले तीन महिने महाविद्यालयाच्या प्रशासनाने शिक्षा दिली आहे. जसे आपण विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर उभा करतो. तसे आम्हाला महाविद्यालयात बसवुन ठेवले आहे.