राज्यपालांच्या उपस्थितीत सेल्फी विथ माटी अभियानाच्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याच्या ४ खंडाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाचा भाग म्हणून राज्यभरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच युवकांनी काढलेल्या ‘सेल्फी विथ माटी’ अभियानात आज विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी मातीसह सेल्फी काढून छायाचित्रे ऑनलाईन टाकण्याचा विश्वविक्रम केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे विश्वविक्रमाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रासेयो राज्य समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी व रासेयो, नेहरू युवा संघटन केंद्र, विद्यापीठांचे व महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यातील मेरी माटी मेरा देश हे अभियान उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढाकाराने रासेयो, नेहरू युवा केंद्र व अन्य युवा संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात आले.
या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याच्या ४ खंडांचे (८ भाग) देखील राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रो. संजय शिंदे यांनी प्रकाशित समग्र साहित्याबद्दल माहिती दिली.