हवामानातील बदलांमुळे रुळांच्या दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेचा अघोषित ब्लॉक, लोकल सेवा विस्कळीत
मुंबई, दि. १९
हवामानातील बदलांमुळे रुळांच्या दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने आज (गुरुवारी) दुपारी अघोषित ब्लॉक घेतल्याने लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती.
गुरुवारी दुपारी १.५० ते २.२० या वेळेत घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. तर दुपारी १.४५ ते २.१० या वेळेत माटुंगा ते शीव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला.
हार्बर मार्गावर दुपारी १.०२ ते १.२० या वेळेत वाशी-मानखुर्द अप मार्गावर ब्लॉक होता.
प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता वेळापत्रकामध्ये अनेक बदल करण्यात आले.
गाड्या अर्धा ते पाऊण तास उशीरा धावत होत्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. या ब्लॉकमुळे लोकल वेळापत्रक बिघडले.
सध्या सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन असे वातावरण आहे. अशा हवामानामुळे काही वेळा रेल्वे रुळाला तडा जातो.
त्यावेळी रुळांची दुरुस्ती, देखभाल करण्यासाठी असा अघोषित ब्लॉक घेण्यात येतो, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
———