डॉ.नीलम गोऱ्हे यांचे जीवन म्हणजे संघर्ष आणि समाजकार्याची गाथा – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १४
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष आणि समाजकार्याची गाथा आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि प्रेरणादायी सदैव राहील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले.
डॉ.गोऱ्हे यांच्या ‘एैस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.
सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ.नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे, असेही राज्यपाल बैस म्हणाले.
ग्रामीण,दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. नीलमताईंचे राजकारणापलीकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ खूप महत्त्वाची असते. वेळ देणे, घेणे आणि ती पाळणे मोठी कसरत असते. लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खूप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि या पुस्तकाचा प्रवास शब्दबद्ध केला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.