Skip to content
मुंबई दि.२५ :- सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले. मुंबईतील ३० महाविद्यालये व शाळांचे संचलन करणाऱ्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्ड या सिंधी अल्पसंख्यांक संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंधी समाजाने फाळणीनंतर विस्थापित झाल्यानंतर मुंबईत येऊन निर्धार, मेहनत व प्रामाणिकपणाने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवले. एचएसएनसी शिक्षण मंडळ या दृढ निर्धाराचे जिवंत उदाहरण आहे, असे राज्यपाल म्हणाले. १९४९ मध्ये वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयापासून सुरुवात करून आज एचएसएनसी ही संस्था ३० महाविद्यालयांचे संचालन करत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल हरीश यांनी दिली. संस्थेतर्फे अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शैक्षणिक संकुल विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी,विश्वस्त माया शहानी, पदमा शाह यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी, सचिव दिनेश पंजवानी यांची भाषणे झाली. एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांनी आभार मानले.