रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; 1500 फूट दरीत वाहन कोसळून 8 पर्यटकांचा मृत्यू
महाराष्ट्रातील आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हळहळले आहे. रायगड जिल्ह्यातील या दुर्दैवी दुर्घटनेत 8 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा खोल दरीत कोसळून चुराडा झाला.
प्राथमिक माहितीनुसार, 8 मित्र फिरण्यासाठी गेले असता त्यांचे वाहन आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावरून तब्बल 1500 फूट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की मृतदेह दरीतील विविध ठिकाणी विखुरले गेले आहेत. त्यामुळे बचाव आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. प्रत्येकी 7 सदस्यांची 5 विशेष पथके तयार करण्यात आली असून, युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची मदत घेतली जात असून, विविध स्वयंसेवी बचाव पथकेही प्रशासनाला सहकार्य करत आहेत. तसेच रायगड पोलीस आणि सातारा पोलीस यांच्यात समन्वय ठेवून कारवाई केली जात आहे.
मृतांपैकी एक जण रत्नागिरी जिल्हा येथील असून उर्वरित सात जण सातारा जिल्हा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
https://x.com/i/status/2058783734233796855
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात राज्य सरकार सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले.
https://x.com/i/status/2058810012177449013
याशिवाय भाजप केंद्रीय सरचिटणीस आणि खासदार विनोद तावडे यांनीही X वर पोस्ट करत या दुर्घटनेला अत्यंत वेदनादायी संबोधले. अपघातात प्राण गमावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील अतिशय निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक घाटमार्ग मानला जातो. खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि धुके यामुळे येथे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत. या दुर्घटनेनंतर घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
