Skip to content
मुंबई दि.२४ :- अंधेरी (पश्चिम) येथील जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून लोखंडवाला संकुल, म्हाडा परिसरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली.
तब्बल आठ तास अव्याहतपणे काम करत बुधवारी रात्री अकरा वाजता जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसराचा गुरूवारी पाणीपुरवठा नियितपणे आणि सुरळीत झाला.
बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर जलबोगदा ते मिल्लत नगर दरम्यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आदर्श नगर रस्ता येथे फुटली. वेल्डींग केलेली लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) निखळल्याने पाणी बाहेर वाहू लागले. जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करुन पाणी गळती त्वरेने थांबविण्यात आली. त्यानंतर लगेचच जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.