Skip to content
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२३ :- भारताची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाली. भारताचे चंद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर यशस्वीपणे उतरले. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरविणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. आपण आता चंद्रावर आहोत, अशा शब्दांत इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आपला आनंद व्यक्त केला.
तर भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण असून तो नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. १४० कोटी लोकांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. हा भारताचा शंखनाद आहे,असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स संमेलनासाठी दक्षिण अफ्रिकेत आहेत. त्यांनी तिथून इस्रोच्या या मोहिमेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. दरम्यान मुंबईत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रो आणि मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.