Skip to content
मुंबई दि.२२ :- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस येत्या ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियल एडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते. आतापर्यंत नौसेना दिवस नवी दिल्ली आणि मुंबई येथे साजरा होत असे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमात नौदलाच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नौदल अधिका-यांकडून देण्यात आली. भारतीय पुरातत्व खात्याच्या परवानग्या आणि अन्य नियोजनासाठी नवी दिल्लीत येत्या २५ ऑगस्ट रोजी विशेष बैठक होणार आहे.