Skip to content
मुंबई दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक परळ येथील केईएम रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या काही कक्षांमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संवाद साधला. रुग्ण आणि नातेवाईक यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन या समस्या तातडीने दूर करण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा कक्ष, वैद्यक विभागाचा कक्ष याचबरोबर केईएम रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम सुरू असलेल्या कक्षांना भेट दिली.
केईएम रुग्णालयातील बंद असलेली क्ष किरण तपासणी यंत्रणा, सोनोग्राफी व एमआरआयसाठी अनेक महिन्यांनंतरची तारीख मिळणे, रुग्णालयातील अस्वच्छता, उंदीर व मांजरांचा सुळसुळाट, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आदी तक्रारी रुग्ण, नातेवाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घातल्या. महापालिकेचे आतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी या प्रकरणी लक्ष घालून तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.