Skip to content
मुंबई दि.१८ :- आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असून सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर रुग्णालयात कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या या healthid.ndhm.gov.in संकेतस्थळावर जाऊन नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मिळालेल्या सूचनांनुसार जाऊन कार्ड काढता येणार आहे.