मुंबई दि १४ :- महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घोळात आता कुणी महापालिकेच्या निवडणुका लावतील आणि पायांवर धोंडा पाडून घेतील असे वाटत नाही. आता ज्या निवडणुका होतील त्या लोकसभेच्याच होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक आज राज ठाकरेंनी यांनी बोलाविली होती. बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
आता ज्या निवडणुका होतील त्या लोकसभेच्याच असतील असे वाटते आहे. प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जाणार असून प्रत्येक मतदारसंघात आमचा चमू जाणार आहे. त्यानुसार त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.
लवकरच या संदर्भातील संपूर्ण कार्यक्रम सर्व पदाधिका-यांना देण्यात येईल.त्यानुसार सर्व पदाधिकारी आपापल्या मतदारसंघात कामाला सुरुवात करतील. आजच्या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यात आले, असेही राज ठाकरे म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असेल? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी, परिस्थितीनुसार सर्व गोष्टी ठरतात, असे सूचक विधान केले.