Skip to content
मुंबई दि.१४ :- ‘महारेरा’ प्रशिक्षणांतर्गत स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांसाठी झालेल्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत २ हजार ८१२ उमेदवार यशस्वी झाले आहेत. पहिल्या परीक्षेला ४२३ उमेदवार परीक्षेला बसले होते आणि ४०५ यशस्वी झाले होते. यावेळी सातपट उमेदवार परीक्षेला बसले होते.मालमत्ता खरेदी-विक्री ही मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून केली जाते.
मात्र दलालांसाठी कोणतेही प्रशिक्षण नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर महारेराने विशिष्ट प्रशिक्षणाच्या आधारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केले आहे.
१ सप्टेंबरपासून हे प्रमाणपत्र दलालांना महारेरा नोंदणीसाठी बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी ‘महारेरा’ने प्रशिक्षण आणि परीक्षा सुरु केली आहे. यशस्वी उमेदवारांत २ हजार ८१२ पैकी ११८ उमेदवार ६० वर्षांवरील आहेत. यात सात महिला असून एकूण २ हजार ८१२ यशस्वी उमेदवारांत ३६० महिलांचा समावेश आहे. मुंबई, पुण्यासह पंढरपूर, लातूर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली , सातारा , सोलापूर भागातील दलाल परीक्षेला बसले होते.