केतकी आणि स्वरा मायलेकींनी उलगडला वारसा संस्कृतीचा!
डोंबिवली दि.३१ :- पोवाड्यापासून लावणीपर्यंत आणि इंग्रजी गाण्यांपासून ते स्फूर्तीगीतापर्यंत आपल्या संस्कृतीचा भाग असणारे विविध गीतप्रकार डोंबिवलीकरांनी रविवारी अनुभवले. निमित्त होते स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती आयोजित एकेएस क्रिएशन्स निर्मित ‘केतकीस्वर’ या कार्यक्रमाचे. ‘सारेगमप’ प्रसिद्ध स्वरा जोशी आणि गायिका केतकी भावे-जोशी या मायलेकी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
निर्मिती आणि संकल्पना अभिजीत जोशी यांची होती. राग बिभासच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वरा आणि केतकीने एकत्र तराणा सादर केला. जिवलगा कधी रे येशील तू, ससा तो ससा , वासाचा पयला,फड सांभाळ तुऱ्याला अशी एकाहून एक अविट या दोघींनी सादर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संगीत आणि वाद्यवृंद संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. दीप वझे , झंकार कानडे (किबोर्ड) , प्रणव हरिदास ( बासरी) , हनुमंत रावडे ( तबला ) , अनिल करंजावकर ( तालवाद्य) , आशिष आरोसकर ( ऑक्टोपड) यांनी संगीतसाथ केली. निवेदन मयुरेश साने यांचे होते. प्रवीण दुधे यांनी प्रास्ताविक केले सियाचेनमध्ये भारतीय सैनिकांसाठी आँक्सिजन प्लँन्टची लोकसहभागातून उभारणी करणा-या सुमेधा चिथडे यांचा गौरव करण्यात आला तर कुलकर्णी ब्रदर्सच्या श्रीपाद कुलकर्णींकडून स्वरा जोशीचा विशेष सन्मान करण्यात आला.
