किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह ध्वनीचित्रफितीमुळे खळबळ, विरोधकांकडून भाजप, सोमय्या यांच्यावर टीका – सोमय्या यांनी आरोप फेटाळले
मुंबई, दि. १८
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह ध्वनीचित्रफितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणी भाजप आणि सोमय्या यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
या प्रकरणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मागणी केली आहे. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असे म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीकडून काल सोमय्या यांचा सहभाग असलेली एक कथित आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित आणि बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह ध्वनीचित्रफिती समाज माध्यमांवरही प्रसारित झाल्या.
सोमय्या यांनी काही महिलांचे शोषण केल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. आता बोललो तर त्या महिलांची ओळख दाखवावी लागेल. यासंदर्भात मी योग्यवेळी बोलेन, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
तर सोमय्या महिलांसोबत असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची चौकशी केली पाहिजे. भाजपने सोमय्यांची हकालपट्टी करावी, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे, असे सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
—-
