कामगारविषयक शासकीय समित्या त्वरित स्थापन कराव्यात – भारतीय मजदूर संघांची मागणी
मुंबई, दि. १८
महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या कल्याणकारी योजना व विविध कामगार कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय समित्या त्वरित स्थापन कराव्यात, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्यातर्फे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया (पुणे) यांच्यावतीने तहसीलदार धनंजय जाधव यांनी निवेदन स्विकारले.
घरेलु कामगार मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ, असंघीटत कामगार कल्याण मंडळ, किमान वेतन सल्लागार समिती, कंत्राटी कामगार निर्मूलन समिती, भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक समिती, सुरक्षा रक्षक मंडळ, माथाडी कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत कामगार कायद्यातील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. यातील समित्यांची गेल्या काही वर्षांपासून पुनर्रचना करण्यात आलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
——
