गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या ८० रेल्वेफेऱ्यांना पेण स्थानकात थांबा
मुंबई, दि. २८
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या ८० रेल्वेफेऱ्यांना पेण स्थानकात थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे पेण आणि परिसरातील प्रवाशांना पनवेलपर्यंत जाण्याचा त्रास वाचणार आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने १५६ विशेष रेल्वेफेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे. यापैकी गाडी क्रमांक ०११७१/२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी विशेषच्या ४० फेऱ्या आणि गाडी क्रमांक ०११५३/४ दिवा-रत्नागिरी मेमूच्या विशेष ४० फेऱ्यांना पेण स्थानकात थांबा देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्स्प्रेस १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रोज मध्यरात्री १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दुपारी २.२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सावंतवाडी येथून दुपारी ३.१० वाजता सुटणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचणार आहे.
दिवा-रत्नागिरी मेमू १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत दिवा स्थानकातून सकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दुपारी २.५५ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. रत्नागिरीहून दुपारी ३.४० वाजता सुटणारी गाडी दिव्यात रात्री १०.४० वाजता पोहोचणार आहे.
——
