तेलंगाणामध्येही हिंदूंवर अत्याचार सुरू- आमदार टी. राजासिंह
फोंडा, दि. २२
पश्चिम बंगालप्रमाणे तेलंगाणामध्येही हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, अशी माहिती तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी येथे दिली.
फोंडा, गोवा येथे सुरू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘तेलंगणा येथील हिंदुद्रोही सरकारची दडपशाही, तसेच हिंदू राष्ट्राचा संघर्ष’ या विषयावर राजसिंह बोलत होते.
तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे राज्यकर्ते धर्मांधांचे लांगुलचालन करत आहे. मुसलमानांच्या लांगुलचालनासाठी मशिदी बांधणे, मदरशांना अनुदान देणे, मौलवींना वेतन देणे यांसाठी निधी दिला जातो; गोरक्षण करणार्या हिंदूंवर गुन्हे नोंदवले जातात. अनेक राज्यांत हिंदूंच्या हत्या असून येणार्या संकटांविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. स्वत:च्या रक्षणासाठी हिंदू युवक आणि युवती यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच हिंदू स्वत:चे आणि धर्माचे रक्षण करू शकतील, असे राजसिंह यांनी सांगितले.
मला हिंदुत्वासाठी जगायचे आहे. आज ना उद्या मृत्यू निश्चित आहे, तर इतिहासात नोंद होईल, असे मरण का नको ? देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत, असेही
राजसिंह म्हणाले.
हिंदु राष्ट्राच्या कार्यात हिंदूंना सहभागी करून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक शनिवारी ११४ गावांमध्ये ‘हनुमान चालीसा’चे पठण करतो. या माध्यमांतून चार हजारहून अधिक हिंदू एकत्र येतात. पुढील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येण्यापूर्वी एक हजार गावांमध्ये हनुमान चालीसा चालू करून ३० हजार युवकांना एकत्र करण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’चे अध्यक्ष कमलेश कटारिया यांनी सांगितले.

नांदेड (महाराष्ट्र) येथे १९ जूनला रात्री चारचाकी वाहनातून जाणार्या गोरक्षकांवर एका टोळीने प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात चार गोरक्षक गंभीररित्या घायाळ झाले असून एका गोरक्षकाचा मृत्यू झाला.
गोरक्षकांवर झालेल्या या आक्रमणाच्या निषेधार्थ ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेधाचा ठराव संमत करण्यात आला.
अमरावती येथील श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर शक्तीजी महाराज यांच्या हस्ते ‘सच्चिदानंद डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.
———
