सामाजिक

मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात बंगाली समाजाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस

राजभवनात प्रथमच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा
मुंबई, दि. २१
मुंबईच्या बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून या समाजाचे मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विकासात फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी राजभवन येथे प्रथमच ‘पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
पश्चिम बंगालने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठी भूमिका बजावली असल्याचे सांगून राज्याने नेताजी सुभाष चंद्र बोस, रविन्द्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारखे द्रष्टे नेते दिले आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेचा मुंबई येथील आश्रम यंदा स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद करून मुंबई येथून स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्व धर्म संसदेत सहभागी होण्याकरिता गेले होते याचे स्मरण राज्यपालांनी केले.

पश्चिम बंगालने केवळ व्यापार वाणिज्य या क्षेत्रांमध्येच नाही, तर सांसदीय लोकशाहीमध्ये देखील महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगताना डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान विसरता येत नाही असेही राज्यपाल बैस म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते रामकृष्ण मठ मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज, ज्येष्ठ तबला व सतार वादक पं. नयन घोष, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ एस. भट्टाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका शारोनी मल्लिक, ताज हॉटेल्सचे उपाध्यक्ष शोमनाथ मुखर्जी, हिंदुजा हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जॉय चक्रवर्ती, ग्रांट मेडिकल कॉलेज येथील निवृत्त सर्जन प्रो. डॉ. गौतम सेन व श्रीजोन फाउंडेशनच्या अध्यक्ष कमोलिका गुहा ठाकुरता यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीजोन फाउंडेशनच्या वतीने पश्चिम बंगालची सांस्कृतिक झलक दाखविणाऱ्या संगीत, नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईतील बंगाली भाषिक मान्यवर उपस्थित होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *