‘महारेरा’कडून गृहप्रकल्पांना मानांकन; पुढील वर्षापासून अंमलबजावणी होणार
मुंबई, दि. १९
ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ‘महारेरा’ ने गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. २० एप्रिल २०२४ पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गृहप्रकल्पांना मानांकन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
येत्या १५ जुलैपर्यंत संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. मानांकनासाठी ठरविण्यात आलेले निकष आणि यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
जानेवारी २०२३ नंतर नोंदणीकृत झालेल्या प्रकल्पांना ही पद्धत लागू केली जाणार आहे. वर्षातून दोनदा प्रकल्पांचे मानांकन जाहीर केले जाणार असून १ ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतील माहितीच्या आधारे पहिले मानांकन २० एप्रिल २०२४ पासून देण्यात येणार आहे.
याबाबत हरकती आणि सूचना suggestions.maharera@gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन ‘महारेरा’ ने केले आहे.
—–