सागरी किनारा मार्गाला समांतर समुद्री पदपथ उभारणार
मुंबई, दि. १९
सागरी किनारा मार्गामुळे मुंबईकरांना ७.५ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी पदपथ मिळणार आहे. हा पदपथ मरिन ड्राईव्ह येथील पदपथापेक्षा मोठा असणार आहे. पदपथालगत सागरी भिंत बांधण्यात येणार असून त्यामुळे सागरी किनारा मार्गाचे संरक्षण होणार आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी किनारा मार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. सागरी किनारा मार्गाला समांतर असा समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे.
भरतीच्या लाटांपासून संरक्षणासाठी या समुद्री पदपथाला लागून सागरी भिंत बांधण्यात येत आहे. जानेवारी २०२० मध्ये या भिंतीचे बांधकाम सुरू झाले असून आतापर्यंत ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
समुद्री भिंत उभारण्यासाठी नवी मुंबईजवळील उलवे येथील खाणीतील आर्मर रॉक या नैसर्गिक दगडांचा वापर करण्यात आला आहे.
—–
