मुंबईतील डबेवाल्यांच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. ९
मुंबईतील डबेवाल्यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भातील धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ निवासस्थानी मुंबई डबेवाले कामगारांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. यामुळे यांसारख्या अन्य इतर घटकांनाही लाभ मिळू शकेल. शहरे विकसित करताना विविध प्रकल्पांच्या उभारणीत गृहनिर्माणाचा साकल्याने विचार करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन बाॅक्स सप्लायर्स चॅरीटी ट्रस्टचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील डबेवाले चाकरमान्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. मुंबई हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने मुंबई व नजिकच्या परिसरात त्यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.
