पर्यटन आणि कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २
जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग यांचे स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे सांगितले.
जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या समवेतच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
जपानच्या भारतातील दूतावास मंत्री हुकुगो क्योको, होम्मा मायू, दूतावास सचिव उसामी कोईची, मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख फुकाहोरी यासुकाटा, राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. जपानकडे आधुनिक तंत्रज्ञान तर आमच्याकडे कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे आपण एकत्र आलो तर खूप मोठा बदल घडवू शकतो. हे एमटीएचएल या भारतातील सर्वात लांबींच्या समुद्री सेतुचे उभारणीतून आपण दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तर महाराष्ट्रातही आम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या संधी दृष्टीपथात आहेत. विशेषतः पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी या क्षेत्रातील आपल्याला एकत्र काम करता येईल, असे हिरोशी यांनी सांगितले.
—–