ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये शुक्रवारी पाणी नाही
पाणी साठा पुरविण्यासाठी आता दर शुक्रवारी पाणी पुरवठा बंद
मुंबई, दि. ३१
बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्या, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार, २ जूनपासून केली जाणार आहे.
त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २ जून रोजी दुपारी १२ ते शनिवार, ३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
या निर्णयामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नियोजनानुसार १५ ऑगस्टपर्यंत पाणी साठा पुरविण्यासाठी जून महिन्यापासून दर शुक्रवारी शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. धरणातील पाणी साठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी एमआयडीसीकडून नियोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात तसेच बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे टिसीसी अशा औद्योगिक वसाहतींनाही पाणी पुरवठा करण्यात येतो.
—–
