विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२७ :- ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेत उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग घेतला. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी शालेय जीवनातील आठवणी जागविल्या. कोणताही ताण न घेता हसतखेळत परिक्षेला सामोरे जा, असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
हेही वाचा :-महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची सोमवारी मुंबईत बैठक
‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. परीक्षा हा उत्सव असून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी कसे वागावे, याबाबतही मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- इमारत कोसळून एक ठार
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच आपल्या शाळेत आले होते. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांच्या संवादातून विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील. परिक्षेदरम्यान येणारा ताणतणाव दूर सारून, आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा :- घरांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाकडून येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.