बाप पळविणा-या टोळीला’ उघडे पाडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली
शेखर जोशी
विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आज (२३ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. हे जर खरे असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा पळपुटेपणा आहे असेच म्हटले पाहिजे. सहा- आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून आजतागायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार, मिंधे, खोके अशा शब्दांत तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री असताना ते जितके मुंबईबाहेर फिरले नाहीत त्यापेक्षा अधिक वेळा ते मुख्यमंत्रीपद गेल्यावर बाहेर पडले. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला म्हणूनही उद्धव ठाकरे सतत टिका करत असतात.
मुंबईकरांच्या वीज देयकात ५० रुपयांनी वाढ होणार; महावितरण पाठोपाठ अदानी, टाटा यांची याचिका
खरे तर चाळीसहून अधिक आमदार, तेरा खासदार, काही महापालिका/नगरपालिकांमधील नगरसेवक इतकी माणसे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेली. खरेतर इतकी माणसे आपल्यला सोडून का गेली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. पण तो सारासार विचार न करता उद्धव ठाकरे हे भोवती जे बदसल्लागार जमा केले आहेत त्यांच्याच सल्ल्याने वागत आहेत, भूमिका घेत आहेत. ही सर्व मंडळी/बदसल्लागार शिवसेना संपवायला निघाले आहेत, याचे भान उद्धव ठाकरे यांन कधी येणार? असो.
‘उबाठा शिवसेना’ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची उद्या घोषणा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरेतर एक मोठी संधी होती. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे थेट त्यांच्यासमोर शिंदे- फडणवीस यांचे वाभाडे काढण्याची, त्यांना उघडे पाडण्याची चांगली संधी उद्धव ठाकरे यांच्यासाठी चालून आली होती. पण त्यांनी ( की बदसल्लागार, किचन कॅबिनेट यांनी सांगितले म्हणून) सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेऊन संधी तर गमावलीच पण वैचारिक लढाईच्या रणांगणातूनही पळ काढला असेच म्हणावे लागेल.
रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांकडून महापालिकेला ‘क्लिनचिट’
मागेही ‘हनुमान चालीसा’ प्रकरणी राणा दाम्पत्याचे आव्हान स्वीकारून त्यांच्या आंदोलनातील हवा उद्धव ठाकरे यांना काढून घेता आली असती. उपरोधिकपणे पण का होईना राणा दाम्पत्याला ‘मातोश्री’ बाहेर मांडव घालून या हनुमान चालिसा म्हणायला, असे सांगितले असते तर राणा दाम्पत्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती मिळाली नसती आणि ते मोठेही झाले नसते.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मुंबईकरांना विनामूल्य प्रशिक्षण
राजकारणात प्रसंगी माघार घेऊन शत्रुला चित करायचे असते, त्याचे दात त्याच्याच घशात घालायचे असतात हे उद्धव ठाकरे विसरले. कंगना राणावत, अर्णव गोसावी प्रकरणीही नाहक अडेलतट्टू भूमिका घेऊन स्वतःचे करून घेतले होते. इतके होऊनही उद्धव ठाकरे भानावर येत नाहीत. विनाशकाले विपरित बुद्धी म्हणतात ती हीच. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले नाही, त्याचा हा अपमान आहे, त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मोदी भक्तांचा आहे, गद्दाराच्या कार्यक्रमाला कशाला जायचे?
हा कार्यक्रम राजकीय आहे असली तकलादू कारणे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे त्याला काहीही अर्थ नाही. मुळात उद्धव ठाकरे आता कोणत्याही संविधानिक पदावर नाहीत. शासकीय रिवाजाप्रमाणे निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, आमंत्रक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नावे देण्यात आली आहेत. राज ठाकरे यांचेही नाव देण्यात आलेले नाही. बरे कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर मान्यवरांना देण्यात आले आहे. मग हा मानापमान कशाला?
मेट्रो ३ प्रकल्पासाठी बंद करण्यात आलेले माहीम-धारावी परिसरातील रस्ते पूर्ववत
अशा कार्यक्रमाच्या वेळी राजकीय हेवेदावे काढणे योग्य दिसले नसते, तिथे उद्धव ठाकरे यांना भाषण करण्याची संधी मिळाली असती का? असे प्रश्न काहीजण विचारतील. समजा भाषण करता आले नसते तरी कार्यक्रमास उपस्थित राहून मोठेपणा घेता आला असता. भाषण करायला मिळाले असते तर शिंदे- फडणवीस यांना किमान पुन्हा एकदा टोमणे तरी मारता आले असते, ‘बाप पळवून नेणा-या टोळीला’ उघडे करता आले असते. आणि अशा कार्यक्रमात शिंदे- फडणवीस यांना उघडे पाडणे औचित्यभंग ठरला असता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करायचा. नाहीतरी या आधीही त्यांनी तो वेळोवेळी केलाच आहे, त्यात आणखी एका प्रसंगाची, भाषणाची भर पडली असती.