सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड
डोंबिवली दि.२३ :- रनर्स क्लॅन फाउंडेशनतर्फे सैनिकांना मानवंदना देण्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ६५ किलोमीटरची ही दौड २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे सुरू होऊन सकाळी डोंबिवलीत पोहोचणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
रनर्स क्लॅन फाउंडेशनचे लक्ष्मण गुंडप, ईश्वर पाटील आणि इतर सदस्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, एनसीपीए, हुतात्मा चौक, पी. डिमेलो रोड, शीव, वडाळा, सायन सर्कल, चेंबूर, वाशी बस आगार, कोपरखैरणे, महापे, शिळफाटा येथून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातून फडके रस्त्यावरील गणपती मंदिरहून कॅ. विजयकुमार सच्चान स्मारक येथे सलामी देवून ग्लोब युनायटेड, उस्मा पेट्रोल पंपच्या पुढे डोबिवली (पूर्व) येथे सकाळी साडेआठ वाजता दौड समाप्त होणार आहे.