बोरीवली ते ठाणे अवघ्या वीस मिनिटांत
ठाणे दि.०६ :- घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून बोरीवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या वीस मिनिटांत करणे येत्या काही वर्षांत शक्य होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
येत्या चार वर्षांमध्ये हे कामे पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ने केले आहे. ठाण्यातील टिकूजी-नी-वाडी ते बोरीवली मागाठाणे २४ किलोमीटर अंतर वाहनाने पूर्ण करण्यासाठी सध्या एक ते दीड तास लागतो. राष्ट्रीय उद्यानाच्या खालून भुयारी मार्गाने हे अंतर ११.८४ किलोमीटरने कमी होणार आहे. बोरिवली-मागाठाणे-एकता नगरमधून ठाणे मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी जवळ हा भुयारी मार्ग तयार होणार आहे. प्रत्येक भुयारामध्ये तीन मार्गिका अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण सहा मार्गिका असणार आहेत.